ठाणे

औषध विक्रेता महिलेची कल्याणमध्ये ऑनलाईन माध्यमातून फसवणूक

पूजा उमेश सिंग असे फसवणूक झालेल्या औषध विक्रेता महिलेचे नाव आहे.

कल्याण: येथील पूर्व भागातील काटेमानिवली भागात राहत असलेल्या एका औषध विक्रेता महिलेची भामट्यांनी वस्तु घरपोच सेवा देण्याच्या नावाखाली ऑनलाईन माध्यमातून दोन लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. मे-जून या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. पूजा उमेश सिंग असे फसवणूक झालेल्या औषध विक्रेता महिलेचे नाव आहे. त्यांनी तिसगाव जरीमरीनगर भागात एक औषध दुकान भाड्याने चालविण्यास घेतले आहे. पूजा या औषध विक्रेता पदविकाधारक आहेत. मे मध्ये संध्याकाळच्या वेळेत पूजा दुकानात बसल्या होत्या. एक इसम औषधांची माहिती घेण्यासाठी दुकानात आला. त्याने जाताना पूजा यांचे भेटकार्ड आणि दुकानाचे छायाचित्र काढून नेले. त्याचे डॅनियल जॅक असे नाव होते.

भेटीच्या दोन दिवसानंतर डॅनियल याने पूजा यांना व्हाॅट्स काॅलवर संपर्क केला. तुम्हाला एक वस्तू खासगी वहन कंपनीकडून पाठविली आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर राम चाली नावाच्या इसमाने पूजा यांना मोबाईलवर संदेश पाठवून ब्राॅडवे शिपिंग डिलिव्हरी कंपनीकडून एक वस्तू आली आहे. ती वस्तू आमच्या ताब्यात आहे. त्या वस्तूवर तुम्हाला सीमा शुल्क भरायचे असल्याने तुम्हाला पहिले २५ हजार रुपये भरावे लागतील. सीमा शुल्क भरले नाहीतर आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल अशी भीती पूजा यांना भामट्यांनी घातली. वस्तू नाकारली तर गुन्हा दाखल होईल या भीतीने भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर पूजा यांनी ऑनलाईन माध्यमातून सीमा शुल्क मुक्त दर, डाॅलर विनिमय दर, प्राप्तिकर, वाहतूक खर्च, इतर दंडात्मक रक्कम अशी एकूण दोन लाख ७५ हजार रुपये भरणा केले. प्रत्यक्षात वस्तू पूजा यांना मिळाली नाही. त्यांनी डॅनियल यांना संपर्क करुन भरणा केलेले पैसे परत करण्याची मागणी सुरू केली. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पैसे परत मिळण्याची खात्री नसल्याने पूजा सिंग यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दोन भामट्यांच्या विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button