पुणे

१३ जणांना अटक, पिस्तूल, कोयते जप्त; पुण्यातील गुन्हेगारांची पुन्हा झाडाझडती

शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री शहरातील गुन्हेगारांची पुन्हा झाडाझडती घेतली.

पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री शहरातील गुन्हेगारांची पुन्हा झाडाझडती घेतली. विशेष मोहिमेत (कोम्बिंग ऑपरेशन) पोलिसांनी १८२४ गुन्हेगारांची तपासणी केली. त्यापैकी ५७७ गुन्हेगार मूळ पत्यावर वास्तव्यास असल्याचे आढळून आले. बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी १३ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन पिस्तूल, सात काडतुसे, १३ कोयते असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत पोलिसांनी अचानक मध्यरात्री विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांची झडती घेतली. बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी १३ सराइतांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, सात काडतुसे, १३ कोयते असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. परिमंडळ एकच्या परिसरात पोलिसांनी गुन्ह्यात पसार असलेल्या दोन आरोपींना अटक केली, तसेच जुगार बंदी कायद्यान्वये दोन जणांना अटक करण्यात आली. तीन जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

परिमंडळ दोन अंतर्गत तीन आरोपींना अटक करण्यात आली. जुगार अड्ड्यांवर छापा टाकून तीन हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परिमंडळ तीन अंतर्गत एका आरोपीस अटक करण्यात आली. जुगार कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. परिमंडळ तीन, परिमंडळ चार, परिमंडळ पाचमधील सराइतांवर कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेने बेकायदा पिस्तूल बाळगल्या प्रकरणी संतोष विनायक नातू (वय ४७, रा. पिंपळगाव, ता. दौंड) याला अटक केली. त्याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तूल, सात काडतुसे जप्त करण्यात आली. लूटमार प्रकरणात हादीहसन सर्फराज इराणी (वय २३), तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. हडपसर, सहकारनगर, भारती विद्यापीठ परिसरात इराणी आणि साथीदारंनी महिलांच्या गळ्यातील साखळीचोरीचे पाच गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

घरफोडी प्रकरणात भगवान विश्वनाथ सदार (वय ३८,रा. पिंपळे गुरव, मूळ रा. चतारी, पातूर, जि. अकोला), सुभाष सुरेश सदार (वय २६,रा. पातूर, जि. अकोला) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. दुचाकी चोरी प्रकरणात जावेद युसुफअली इराणी (वय २७, रा. शिवाजीनगर) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जुगार कायद्यान्वये ४२ जणांना अटक करण्यात आली आहे. २४ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहरातून तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग केल्या प्रकरणी पाच जणांना पकडण्यात आले. वाहतूक शाखेने १०५७ वाहनचालकांची तपासणी करुन २९२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून दोन लाख ६८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, प्रवीणकुमार पाटील, रंजनकुमार शर्मा, उपायुक्त अमोल झेंडे, संदीप सिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, तसेच विविध पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेची पथके विशेष मोहिमेत सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button