जीवघेणा गरबा! 24 तासांत 12 बळी; त्यांच्यासोबत काय घडलं?
अहमदाबाद, 21 ऑक्टोबर : सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. सगळीकडे गरब्याची धूम आहे. गुजरातमध्ये तर गरबा अगदी मोठ्या दिमाखात खेळला जातो. पण याचवेळी तिथं अचानक मृत्यूही होऊ लागले आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
यात किशोरवयीन मुलं, तरुण आणि प्रौढांचा समावेश आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात अचानक होत असलेल्या या मृत्यूमुळे चिंता वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. ज्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु चिंतेची बाब म्हणजे किशोरवयीन मुले आणि तरुण प्रौढ त्याचे बळी ठरत आहेत. गेल्या 24 तासांत हृदयविकाराच्या झटक्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
राजकोटमध्ये एका 28 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला
तर राया रोडवर एका बिल्डरला हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याचाही मृत्यू झाला.
अहमदाबादच्या हातीजानमध्ये गरब्यादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला.
याशिवाय द्वारका, ग्रेटर अंबाला आणि रामनगरमध्येही 3 तरुणांचा मृत्यू झाला आहे.
सुरतमध्येही हृदयविकाराच्या झटक्याने 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
वडोदरातील हर्णी परिसरात गरबा खेळताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
दाभोईमध्येही एका 13 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
नवसारी येथेही गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
अमरेली आणि जामनगरमध्ये प्रत्येकी दोन मृत्यूची नोंद झाली आहे.
नवरात्रीच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढल्याने चिंतेमध्ये मोठी वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासनानं गरबा आयोजकांना प्रत्येक गरबा महोत्सवात रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके तैनात करण्यास सांगितले आहे.