मुंबई

“माझ्या आजोबांना…”, आदित्य ठाकरेंची गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही फोटो काढले आणि…!”

आदित्य ठाकरे म्हणतात, “सर्वात आधी पालिकेत जाऊन अतिक्रमण करून बसलेल्या पालकमंत्र्यांवर गुन्हे का दाखल होत नाहीत? पालिका आयुक्तांना बढती…!”

ठाकरे गटाचे आमदार व उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यासह ठाकरे गटाच्या इतर काही नेत्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या डिलाईल रोड येथील उड्डाणपुलाच्या एका लेनचं उद्घाटन न करताच आदित्य ठाकरेंनी तो रस्ता चालू केल्याचा आरोप त्यांच्यावर व त्यांच्या इतर नेत्यांवर करण्यात आला आहे. या गुन्हा प्रक्रियेची सध्या मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा चालू असताना आदित्य ठाकरेंनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय झालं?

१६ नोव्हेंबर रोजी रात्री आदित्य ठाकरे ठाकरे गटाच्या इतर काही नेते व पदाधिकाऱ्यांसमवेत या रस्त्यावर पोहोचले. रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर तिथे बॅरिकेट्स उभे करण्यात आले होते. आदित्य ठाकरेंनी ते बॅरिकेट्स बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला. यानंतर त्यांच्यासह ठाकरे गटाचे नेते सुनील शिंदे व सचिन अहिर यांच्याविरोधात मुंबई महानगर पालिकेच्या एका अधिकाऱ्याने एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे या तिघांवर कलम १४३, १४९, ३२६ व ४४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

आदित्य ठाकरे म्हणतात…

“माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर काही गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मुंबईकरांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी दाखल करण्यात आले आहेत. डिलाइल रोडची १२० मीटरची एक लेन तयार असून १० ते १५ दिवसांपासून बंद ठेवली होती. कारण इथल्या घटनाबाह्य खोके सरकारला उद्घाटन करण्यासाठी वेळ नव्हता. तिथल्या रहिवाशांना, काम करणाऱ्या लोकांना अनेक वर्षं तो त्रास होता”, असं आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाच्या तीन नेत्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

“आम्ही परवा रात्री (१६ नोव्हेंबर) तिथे गेलो, तेव्हा तिथे काही बॅरिकेट्स होते. ते बाजूला करून तिथून आम्ही पुढे चालत गेलो. फोटो काढले आणि रस्ता खुला झाला हे सांगितलं. ही बाजू १०-१५ दिवसांपासून तयार होती. चाचण्या वगैरे सगळं झाल्यानंतरही उद्घाटन कधी करायचं त्यासाठी वेळ मिळत नसलयामुळे मुंबई महानगर पालिका थांबली होती. आम्ही तिथे जाऊन मोठ्या अभिमानाने उद्घाटन केलं आहे. मुंबईकरांसाठी लढत असताना माझ्यावर गुन्हे दाखल झाले असतील, तर माझ्या आजोबांना माझा अभिमान वाटला असता अशीच ही घटना आहे”, असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

पालिका आयुक्तांवर टीकास्र

दरम्यान, पालिकेत अतिक्रमण करून बसलेल्या पालकमंत्र्यांवर गुन्हा का दाखल होत नाही? असा सवाल करताना आदित्य ठाकरेंनी पालिका आयुक्तांनाही लक्ष्य केलं आहे. “सर्वात आधी पालिकेत जाऊन अतिक्रमण करून बसलेल्या पालकमंत्र्यांवर गुन्हे का दाखल होत नाहीत? पालिका आयुक्तांना बढती हवी असल्याचं आम्ही ऐकलं. गेल्या वर्षभरात पालिकेतील भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर आणला. या सगळ्या घोटाळ्यांवर त्यांची सही आहे. अशा व्यक्तीला बढती मिळणार आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button