मुंबई

मुंबईत एका दिवसांत १.०७ लाखांचा गुटखा, पान मसाला जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसालाची बेकायदा विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे आल्या होत्या.

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी बोरिवली, परळ, दादर, जोगेश्वरी पश्चिम, मुलुंड पश्चिम येथे कारवाई करून १ लाख ७ हजार ४२० रुपयांचा गुटखा व पान मसाला जप्त केला. तसेच याप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन आणि मुंबई पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसालाची बेकायदा विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी अन्न व औषध प्रशासनाकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी मुंबई पोलिसांच्या मदतीने शहरामध्ये धडक मोहीम हाती घेतली.

जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा परिसरातील ओशिवरा सुपारी स्टोरवर केलेल्या कारवाईमध्ये तब्बल ८१ हजार ७८ रुपयांचा पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. तसेच तपासणीसाठी तीन नमुने घेण्यात आले. प्रतिबंधित पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी दुकानाचा मालक मोहम्मद अली इर्शाद अहमद शेख याला अटक करण्यात आली. तसेच बोरिवली पश्चिमेकडील चामुंडा सर्कलजवळील गिरिजा स्टोर आणि रोकडिया लेन येथील गोकुळ पान शॉपवरही कारवाई केली. या कारवाईत ९ हजार १९६ रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. यातील १२ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या दोन्ही दुकानाच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

त्याचप्रमाणे परळ एस. टी आगराजवळील दुबे पान शॉप आणि दादर पश्चिम येथील बी. एस. रोडवरील किरण पान बिडी शॉपवर कारवाई करण्यात आली. या दुकानांतून ९ हजार १४२ रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त करून २० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आला. या दोन्ही दुकानांच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.मुलुंड पश्चिम येथील महाकाली पान शॉप, साई पान शॉप, शीव पान शॉप, साची पान शॉप, रानु उपाध्याय पान बिडी शॉप आणि राजेश जेठालाल हॅण्डक्राट या दुकानांवरही कारवाई करण्यात आली. या दुकानांमधून २८ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तसेच ८ हजार ४ रुपयांचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. तसेच सहाही दुकान मालकांविरोधत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाने मुंबई पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button