मुंबई

धुलीकणांचे प्रमाण वाढले, देवनारमधील हवा ‘अतिवाईट’, शीव, मालाड, वांद्रे-कुर्ला संकुलमधील हवा ‘वाईट’

मुंबई : मुंबईमधील हवेचा दर्जा पुन्हा खालावू लागला असून समीर ॲपवरील नोंदीनुसार शहरातील हवेचा दर्जा काही दिवसांपासून ‘मध्यम’ ते ‘वाईट’ श्रेणीत नोंदला जात आहे. वातावरणातील घातक पीएम २.५ आणि पीएम १० धुलीकणांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. देवनार येथे शुक्रवारी सायंकाळी अतिवाईट हवेची नोंद झाली असून तेथे हवा गुणवत्ता निर्देशांक ३०५ नोंदवला गेला. अशा वातावरणात घराबाहेर पडणेही धोकादायक ठरू शकते. त्याचबरोबर शीव, मालाड, वांद्रे-कुर्ला संकुल, शिवाजी नगर, शिवडी, घाटकोपर आणि कांदिवली या परिसरातील हवा वाईट असल्याची नोंद शुक्रवारी करण्यात आली.

मुंबई शहरात धुलीकणांच्या प्रमाणाने धोकादायक पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सध्या शहरातील हवा धोकादायक असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून येत आहेत. सतत वाढत असलेल्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेचा दर्जा खालावत आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार हवेतील पीएम २.५ आणि पीएम १० या धुलीकणांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी सायंकाळी देवनार येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ३०५ होता, तसेच तो शीव २०६, मालाड २४०, वांद्रे-कुर्ला संकुल २०३, शिवाजी नगर २९६, शिवडी २६८, घाटकोपर २५०, कांदिवली येथील २१७ इतका होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार हवा गुणवत्ता निर्देशांकातील ०-५० म्हणजे चांगले, ५१-१०० म्हणजे समाधानकारक, १०१-२०० दरम्यान मध्यम, २०१-३०० दरम्यान वाईट, ३०१-४०० दरम्यान अत्यंत वाईट आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे अतिधोकादायक समजली जाते.देवनार येथे पीएम २.५ कणांची मात्रा अधिक आहे. पीएम २.५ हे अधिक घातक असून हे श्वसनाद्वारे शरीरात जातात, त्याचे हवेतील सामान्य प्रमाण हे ३५ मायक्रो घनाहून जास्त नसावे. किंबहुना हे कण पीएम १०च्या तुलनेत सूक्ष्म असल्याने सहज शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे ते आरोग्यास घातक ठरतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button