मुख्यंमत्री शिंदे यांचं विधान,मुंबई पारबंदर प्रकल्प नवीन मुंबई अन् रायगडचा विकास साधेल
शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतूचे १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे
मुंबई : मुंबई पारबंदर प्रकल्पामुळे (शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतू) मुंबई ते नवी मुंबई असा दीड ते दोन तासाचा प्रवास केवळ २० मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे वाहनचालक, प्रवाशांना दिलासा मिळणार आहेच, पण त्याचवेळी नवी मुंबई, रायगडचा सर्वांगीण विकास होईल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केले
शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतूचे १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाच्या कामाचा आणि लोकार्पणाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आय.एस. चहल, मुंबई महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आदी उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) देशातील सर्वात लांब अशा २१.८० किमी लांबीच्या शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतूचे काम अखेर आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.
१२ जानेवारीला नवी मुंबईत लोकार्पणाचा भव्य सोहळा संपन्न होणार आहे. तेव्हा शनिवारी सकाळी मुख्यमंत्री या सागरी सेतूवर पोहचले आणि त्यांनी प्रकल्पाचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे प्रवास अतिवेगवान होणार असून नवी मुंबई, रायगडचा आर्थिक, औद्योगिक विकास साधला जाणार आहे. तर मुंबईतील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकल्पाचे काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण केले असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लेमिंगो पक्षी वाढले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सागरी सेतूची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला अनेक सूचना केल्या. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी सागरी सेतूची स्वछता राखावी, सुशोभीकरण करावे आणि वृक्षारोपण करावे अशा सूचना केल्या. चिर्ले पथकर नाक्याजवळील वाहतूक नियंत्रण केंद्रालाही (कमांड सेंटर) यावेळी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. सागरी सेतूवरील वाहतुकीचे नियंत्रण आणि सीसीटीव्ही यंत्रणेचे कार्य आदींची माहिती घेतली. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनासह एमएमआरडीए अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.