सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!“सप्तपदीशिवाय हिंदू विवाह मान्य नाही”
बुधवारी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी. नागरत्ना यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
हिंदू विवाह हा एक संस्कार असून हा नाच-गाण्याचा, जेवणाचा किंवा दारु पिण्याचा कार्यक्रम नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तसेच सप्तपदी आणि इतर विधींशिवाय हिंदू विवाह मान्य नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. बुधवारी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी. नागरत्ना यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.“हिंदू विवाहादरम्यान जर आवश्यक ते विधी झाले नाही, तर तो विवाह मान्य होणार नाही. असे विवाह निरर्थक समजले जातील. नोंदणी केली, तरी हे विवाह वैध राहणार नाहीत. कारण हिंदू विवाहदरम्यान सप्तपदीसारखे विधी अतिशय महत्त्वाचे आहेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच वादविवादांच्या प्रकरणात असे विधी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातात”, असेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.“हिंदू विवाह हा एक संस्कार असून विवाहाला भारतीय समाजात एक महत्त्वाची संस्था म्हणून दर्जा मिळायला हवा. तसेच तरुणांनी विवाहाचा विचार करताना भारतीय समाजात विवाह संस्था ही किती पवित्र आहे, याचा विचार करायला हवा”, असेही न्यायालयाने म्हटले आहे.“लग्न म्हणजे नाच-गाणे, जेवणे, दारु पिणे किंवा हुंड्यासह अनावश्यक वस्तूंची देवाण घेवाण करण्याचा कार्यक्रम नाही. हा भारतीय समाजातील एक महत्त्वाचा समारंभ आहे. या समारंभाद्वारे स्त्री आणि पुरुष यांच्यात एक विशिष्ट नातं तयार होतं, त्यांना पती-पत्नीचा दर्जा दिला जातो”, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली आहे.