पोलीस तपासात चक्रावून टाकणारी माहिती उघड,कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण ?
पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार यांच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे.
मुंबई ; मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार यांच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. मोबाइल चोरट्यांचा पाठलाग करताना त्यांनी आपल्याला विषारी इंक्जेक्शन दिल्याचा दावा विशाल पवार यांनी मृत्यूपूर्वी केला होता. मात्र, ही रचलेली कथा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.मोबाइल चोरांनी आणि नशेखोरांनी केलेल्या कथित हल्ल्यावेळी विशाल पवार घटनास्थळी उपस्थित नसल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तपासणीत समोर आलं आहे. तसेच विशालने माटुंगा स्थानकावर रात्र काढल्याचे सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात दिसून येत नाहीये.कथित हल्ल्याच्या वेळी आणि त्यानंतरचे ४ ते ५ तास विशाल पवार हे इतरत्र असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे विशाल पवार याने फटका गँग आणि विषारी इंजेक्शन ही कथा रचलेली असल्याच्या संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार यांचा बुधवारी ठाण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी त्यांनी पोलिसांना जबाब दिला होता. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता सायन-माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना एका टोळक्याने माझ्या हातावर वार करून मोबाइल घेऊन पळ काढला, असं विशाल पाटील यांनी म्हटलं होतं.चोरट्यांचा पाठलाग करत असताना त्यांनी मला घेरलं आणि विषारी इंजेक्शन दिलं. त्यामुळे बेशुद्ध होऊन मी रेल्वे ट्रॅकजवळ पडून होतो, असंही विशाल पाटील यांनी म्हटलं होतं. जाग आल्यानंतर मी माटुंगा रेल्वेस्थानक गाठलं आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो, असंही विशाल पाटील यांनी मृत्युपूर्वी सांगितलं होतं.