सत्ताकारण

काँग्रेसने केली होती तक्रार,अमित शाह यांच्याविरोधात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

हैदराबादमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यापैकी दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे सध्या सर्वच ठिकाणी प्रचाराची धामधूम जोरात सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सभा, रॅली, मेळाव्यांचा धडाका सुरू आहे. अशातच मोठी बातमी समोर आली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हैदराबादमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आला आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची १ मे रोजी हैदराबादमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्यानिमित्ताने रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत अमित शाह यांच्यासह तेलंगणा भाजपाचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. या रॅलीमधील काही फोटो समोर आले असून या फोटोमध्ये अमित शाह यांच्याबरोबर व्यासपीठावर काही लहान मुले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यासंदर्भात तेलंगणा काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयोगाने याची दखल घेतली. .केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत तेलंगणा काँग्रेस पक्षाचे नेते निरंजन रेड्डी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, १ मे रोजी भाजपाची हैदराबादमध्ये रॅली पार पडली. या रॅलीमध्ये अमित शाह यांच्यासह आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी रॅलीदरम्यान अमित शाह यांच्याबरोबर काही लहान मुले व्यासपीठावर दिसून आली आहेत.व्यासपीठावरील या लहान मुलांच्या हातात भाजपाचे चिन्ह कमळ असणारे एक फलक धरण्यात आले आहे. त्यामुळे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे निरंजन रेड्डी यांनी आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. निरंजन रेड्डी यांनी पुढे असेही म्हटले की, लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आयोगाने काही महत्वाच्या सूचनाही प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामध्ये राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या प्रचारात किंवा सभा आणि निवडणकीच्या संबंधित मोहिमेमध्ये लहान मुलांचा वापर करण्यात येऊ नये, असे बजावले होते.दरम्यान, निरंजन रेड्डी यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी अमित शाह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच अमित शाह यांच्याबरोबर टी यमन सिंह, भाजपाचे ज्येष्ठ नेते जी किशन रेड्डी आणि आमदार टी राजा सिंह यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची पुढील चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button