maharastra

मल्याळम अभिनेत्रीने सांगितली घटना,बलात्काराचं दृष्य १७ वेळा चित्रीत करायला लावलं, दिग्दर्शकाने त्यानंतर…

असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट म्हणजेच AMMA या संघटनेतील काही सदस्यांवर मल्याळम सिनेविश्वातील कलाकारांकडून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते.

मल्याळम सिनेविश्वातील कलाकारांकडून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. पाठोपाठ इतरही काही महिला कलाकारांनी त्यांना आलेले विचित्र अनुभव जाहीर केले आहेत. याप्रकरणी न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर AMMA ची कार्यकारिणी समिती देखील बरखास्त करण्यात आली आहे. सुरस्टार मोहनलाल यांनी AMMA च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती के. हेमा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या अहवालानंतर मल्याळम चित्रपटसृष्टी हादरली आहे. तसेच याप्रकरणी अनेक मोठ्या दिग्दर्शक व अभिनेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.चित्रपटांच्या सेटवर महिला कलाकारांचा कसा छळ केला जातो त्याबाबत एका डबिंग कलाकाराने टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर सांगितलं आहे. ओळख स्पष्ट न करण्याच्या अटीवर या महिलेने सांगितलं की “एका चित्रपटातील बलात्काराचं दृष्य चित्रीत करण्यासाठी तिला एक दोन नव्हे तर तब्बल १७ रीटेक करायला लावले होते. ती म्हणाली, वयाच्या १७ व्या वर्षापासून मी नायिकांच्या पात्रांना आवाज देत आहे. सुरुवातीच्या काळात एका दिग्दर्शकाने कास्टिंग काऊचसाठी माझ्याशी संपर्क साधला होता. मी त्यांना म्हणाले, सर तुम्ही चुकीचं करताय. मी त्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं व माझ्या डबिंगच्या कामाकडे वळले. त्यानंतर त्यांनी मला बलात्काराचा सीन १७ वेळा करायला लावला”.अभिनेत्री व डबिंग कलाकार महिला म्हणाली, “ते मला सतत रीटेक करायला लावत होते. त्यामुळे मी त्यांना विचारलं नेमकी काय समस्या आहे? त्यावर ते मला म्हणाले, आवाज बरोबर येत नाही. त्यानंतर मी त्यांना म्हणाले, तुम्ही दुसऱ्या कलाकाराला बोलावून तिच्याकडून हे दृष्य करून घ्या, मी निघते. मात्र त्याचवेळी त्या चित्रपटाच्या निर्मात्याने मला अडवलं. मात्र मी त्यांना जुमानलं नाही. त्यानंतर दिग्दर्शक व निर्मात्याने मला घेरलं. ते दोघे अशा प्रकारे वागत असताना स्टुडिओमधील इतर कोणत्याही कलाकाराने या दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या बाजूने कोणीच उभं राहिलं नाही. मी त्यांना बाजूला करून तिथून निघून गेले. त्यानंतर इतर कलाकारांनी माझं डबिंग केलं. मी मात्र परत कधीच त्या दिग्दर्शकाबरोबर, निर्मात्याबरोबर काम केलं नाही”.दरम्यान, मल्याळम चित्रपटसृष्टीत महिलांबरोबर होत असलेल्या गैरप्रकारांसंदर्भात केरळ सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर बैठक बोलावून महिला कलाकारांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी सात सदस्यांचं एक विशेष पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पुढील दोन महिन्यांत AMMA ची नवीन कार्यकारिणी पदभार स्वीकारणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button