मुंबई

वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांतील पासधारक प्रवाशांची मागणी,आमचे पैसे परत द्या ?

मुंबई : एका वातानुकूलित रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे, तर अतिरिक्त रेक उपलब्ध नसल्याने वातानुकूलित उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. एसी लोकलच्या सुमारे १० फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. एसी लोकलचे महागडे तिकीट विकत घेऊनही साधारण लोकलमधून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली. त्यामुळे एसी लोकल जितके दिवशी रद्द केल्या जातील, त्या दिवसांचे पैसे परत करावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.सामान्य लोकलच्या प्रथम व द्वितीय श्रेणीच्या तुलनेत एसी लोकलचे तिकीट दर अधिक आहेत. या लोकलच्या वेळेत सामान्य लोकल चालवण्यात येत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. वातानुकूलित लोकलमधून प्रवास करण्यासाठी प्रवासी अधिक पैसे मोजून तिकीट अथवा पास घेत आहेत, परंतु त्यांना सामान्य लोकलमधून प्रवासा करावा लागत आहे. प्रवाशांनी एसी लोकलची मागणी केली नव्हती. तरीही एसी लोकल चालवण्यात आली. त्यानंतर या लोकलमध्ये गर्दी वाढू लागली. त्यामुळे या लोकलमधील प्रवाशांचा प्रवास योग्यरित्या करून देण्याची जबाबदारी मध्य रेल्वेची आहे. मात्र, थेट लोकल रद्द करण्यात येते. एसी लोकल चालवता येणे शक्य नसल्यास, हार्बर, ट्रान्स हार्बरप्रमाणे मुख्य मार्गावरील एसी लोकल पूर्णत: रद्द कराव्यात, असे मत उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.गेल्या काही दिवसांमध्ये अनेक वेळा वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या रद्द होत आहेत. दररोज प्रवाशांकडून अनेक तक्रारी येत आहेत. मात्र, असे असले तरी रेल्वे प्रशासन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करीतच आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या पासधारकांना त्यांचे पैसे परत देणे आवश्यक आहे. तसेच वातानुकूलित लोकलचे रेक वाढविणे आवश्यक आहे, असे रेल यात्री परिषदेचे सुभाष गुप्ता यांचे म्हणणे आहे. १४ सप्टेंबर रोजी ९ वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. १६ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेवरील मुंब्रा – दिवादरम्यान दादर – बदलापूर वातानुकूलित लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली होती. तर, वातानुकूलित रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने २१ सप्टेंबर, २३ सप्टेंबर आणि २५ सप्टेंबर रोजी प्रत्येकी १० वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button