आमदार आशिष शेलार यांचा आरोप,मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार
महापालिकेने एकही नवीन धरण बांधले नाही, पाण्याच्या नव्या स्रोताची व्यवस्था केली नाही, उलट गारगाई धरण प्रकल्प रद्द केला आणि समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव जबरदस्तीने मुंबईकरांच्या माथी मारला.
मुंबई : गेल्या दहा वर्षांत मुंबई महापालिकेने एकही नवीन धरण बांधले नाही, पाण्याच्या नव्या स्रोताची व्यवस्था केली नाही, उलट गारगाई धरण प्रकल्प रद्द केला आणि समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव जबरदस्तीने मुंबईकरांच्या माथी मारला. तोही पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे आज मुंबईची ही अवस्था झाली आहे. त्याला संपूर्णपणे आदित्य ठाकरे आणि त्यांचा पक्ष जबाबदार आहे, असा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला.मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारी सातही धरणे काठोकाठ भरली आहेत. मात्र असे असले तरी मुंबईत अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मुंबईची लोकसंख्या वाढत असल्यामुळे त्या तुलनेत पाणीसाठा कमी पडू लागला आहे. मुंबईच्या पाणीपुरवठ्यात मोठी तूट असल्याची बाब पुढे आल्यानंतर आता यावरून राजकीय आरोप सुरू झाले आहेत. आमदार आशिष शेलार यांनी पाणीपुरवठ्यातील तुटीला शिवसेना (ठाकरे) पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मुंबईत ठिकठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अनेक ठिकाणी पाणीच येत नाही. त्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत लोकप्रतिनिधींकडे अनेक तक्रारी करण्यात येत आहेत. नव्वदच्या दशकात मुंबईच्या पाणीपुरवठ्या बाबत अभ्यास करून कृती आराखडा सादर करण्यासाठी डॉक्टर माधवराव चितळे यांची समिती मुंबई महापालिकेने स्थापन केली होती. या समितीने गारगाई आणि पिंजाळ व मध्यवैतरणा या तीन धरणांचा कृती आराखडा मुंबई महापालिकेला तयार करून दिला. मुंबई महापालिकेने मध्य वैतरणा प्रकल्प २०१४ ला पूर्ण केला. त्यानंतर एकही प्रकल्प महापालिकेने हाती घेतलेला नाही. गारगाई धरणाच्या परवानग्या आणि नियोजन सुरू झाले होते. मात्र तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांचे सरकार राज्यात आणि महापालिकेत असताना हा प्रकल्प रद्द केला. कंत्राटदारांच्या प्रेमातून अत्यंत महागडा असलेला समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पुढे रेटला. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत ४,४०० कोटी रुपये होती. आता हा प्रकल्प आठ हजार कोटी रुपयांवर गेला आहे. मात्र तरीही या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्याला प्रतिसाद मिळत नाही. या सगळ्याचा परिणाम मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे. आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने हा केलेला खेळखंडोबा असून याचे दुष्परिणाम मुंबईकरांना भोगावे लागत आहेते, असा आरोप शेलार यांनी केला.मुंबईत ३४ टक्के पाणी गळती होत आहे, असे महापालिकेचे म्हणणे आहे. गळती रोखण्यासाठी कोट्यावधीची कंत्राटे दिली, पण त्याचे पुढे काय झाले, असा शेलार यांनी यावेळी केला. समुद्राचे खारे पाणी गोडे करणे खर्चिक आहे. मात्र तरीही हा प्रकल्प पुढे रेटला व गारगाई प्रकल्प रद्द केला. गारगाई प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या झाडांचे पुनर्वसन व नवी वनराई निर्माण करण्यासाठी जागाही निश्चित झाली होती. पण आदित्य ठाकरे यांनी हा प्रकल्प रद्द केला व कंत्राटदारांच्या फायद्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प पुढे रेटला, असा आरोप शेलार यांनी केला.