पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल,लाच मागणं पडले भारी …
खासगी व्यक्तीमार्फत दहा हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुणे :खासगी व्यक्तीमार्फत दहा हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिरूर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकावर ही कारवाई केली आहे. पोलीस उपनिरीक्षक माणिक बाळासाहेब मांडगे तसेच खासगी व्यक्ती सुभाष मुंजाळ यांच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा नोंद केला आहे. माणिक मांडगे हे शिरूर पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत.
दरम्यान, यातील तक्रारादार यांच्या मुलाविरूद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्यांच्या मुलाला अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी लोकसेवक मांडगे यांनी तक्रारदारांकडे २५ हजारांची मागणी केली होती. त्याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची एसीबीने पडताळणी केली. त्यात सुभाष मुंजाळ याच्याशी तक्रारदारांना बोलण्यास सांगितले. तेव्हा मुंजाळने तक्रारदारांकडे साहेबांसाठी १० हजार रुपयांची मागणी केली. त्याला लोकसेवक मांडगे यांनी दुजेरा दिल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. त्यानूसार एसीबीने लाच मागणीचा गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पुणे एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.