जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, 60 जणांना घेतले ताब्यात
काही वर्षांपासून अवैध धंद्यामधील सर्वाधिक मोठा अन् चौकीच्या अगदीच जवळ चालविल्या जात असलेल्या मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.
पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात गेल्या काही वर्षांपासून अवैध धंद्यामधील सर्वाधिक मोठा अन् चौकीच्या अगदीच जवळ चालविल्या जात असलेल्या मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांच्या सक्त आदेशानंतर देखील जुगार सुरू असल्याचे समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. छापा कारवाईत तब्बल ६० जणांना ताब्यात घेतले आहे. तर, १ लाख २ हजार रुपये रोकड, ४७ मोबाईल जप्त केले. तर पोलिसांनी याच परिसरातील आणखी एका दुसऱ्या जुगार अड्यावर छापा मारून कारवाई केली होती. याप्रकरणी आरोपींवर खडक पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पदभार स्विकारताच शहरातील अवैध धंद्ये बंद करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पोलीस दलात देखील आयुक्तांच्या दराऱ्यामुळे हे धंदे पोलिसांकडून बंदचे आवाहन केले होते अन् तशा सूचना देखील देण्यात आलेल्या होत्या. परंतु, काही ठिकाणी पुन्हा छुप्या पद्धतीने हे अवैध धंदे सुरू झाले. त्याला पोलीस ठाण्याच्या स्थरावर डोळेझाक परवानगी दिली जात असत.मात्र पोलीस आयुक्तांनाच मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शुक्रवार पेठेतील जनसेवा भोजनालय येथील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री छापा टाकला. छाप्यात तब्बल ६० जणांना ताब्यात घेतले. शहरातील सर्वाधिक मोठा मटका असल्याचे बोलले जाते. मटका किंग म्हणून ओळख असलेल्या नंदू नाईकचा होता. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अवैध व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिल्यानंतरही अनेक भागात छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू आहेत. अनेक भागात स्पा सुरु आहेत. विशेषतः शहराच्या पूर्व भागात म्हणजेच परिमंडळ चार आणि पाचचा समावेश असलेल्या भागात हे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.