पुण्यात नागरिकांना अडवून मोबाईल चोरणारा पोलिसांच्या अटकेत; १४ मोबाईल जप्त
दक्ष पोलिस न्यूज प्रतिनिधी (पुणे) : पुणे शहर परिसरात नागरिकांना अडवून जबरदस्तीने त्यांच्याकडील मोबाईल हिसकवणार्या आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून चोरीचे तब्बल १४ मोबाईल, एक दुचाकी असा एक लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विमानतळ, भारती विद्यापीठ, बिबवेवाडी, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सुलतान उर्फ हाफीज महंमद शेख (२०, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. विश्रांतवाडी भागातील शांतीनगर ते चव्हाण चाळ मार्गावरील रस्त्यावर हातामध्ये लोखंडी रॉड घेवून एकजण दहशत पसरवित असल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली होती. यानूसार पथकाने सापळा रचून शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने शहर परिसरातील विविध भागात मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची कबूली दिली. शेख याच्याकडून चोरीचे तब्बल १४ महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तसेच, गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी, एक लोखंडी कोयता, सिगारेटची पाकिटे असा १ लाख ६० हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेखने शहरातील भारती विद्यापीठ, विमानतळ, लोणीकंद, मार्केटयार्ड, बिबवेवाडी परिसरातून हे मोबाईल चोरल्याचे निष्पन्न झाले असून विविध पोलीस ठाण्यातील ७ गुन्ह्याचा छडा लागला आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार दिपक चव्हाण, प्रफुल मोरे, संदीप देवकाते, शेखर खराडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.