गुन्हेगारी

यूट्यूब व्हिडीओ लाईक करा पैसे मिळवा, ऑनलाइन टास्कच्या नावाखाली मॅनेजरने ३९ लाख गमावले

मुंबई : सोपे टास्क देऊन बँक खाती रिकामी करण्याचे प्रकार सायबरचोरांकडून सुरूच आहेत. पोलिसांकडून वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करूनही नागरिक विशेषतः उच्चशिक्षित तरूण सायबरचोरांच्या जाळ्यात अडकत आहेत. एका कंपनीत मॅनेजर असलेल्या दक्षिण मुंबईतील तरूणाने तब्बल ३९ लाख रूपये टास्कच्या नादात गमावले. मुंबईतील वेगवेगळ्या भागांत आठवड्याभरात अनेकांची टास्कच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे.

कफ परेड येथे वास्तव्यास असलेला ३८ वर्षीय सागर (बदललेले नाव) हा एका प्रसिद्ध कंपनीत मॅनेजर पदावर नोकरीला आहे. सागरच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून संदेश आला. यामध्ये मी इन्फ्लुएन्सर असून यूट्यूबच्या वतीने पार्ट टाइम नोकरी घेऊन आलो आहे, असे या संदेशात नमूद केले होते. सागरने संदेशातील लिंकवर क्लिक केले असता, यूट्युबवरील व्हिडिओला लाइक केल्याचा टास्क पूर्ण केल्यास दोनशे रुपये मिळणार, असे नमूद केले होते. त्यानुसार सागरने एका व्हिडिओला लाइक केल्यावर त्याच्या बँक खात्यात दोनशे रुपये जमा झाले.

सागर त्यानंतर या टास्कच्या कामासाठी अनोळखी व्यक्तीने सुरू केलेल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी झाला. यामध्ये वेगवेगळ्या टास्कबाबत सर्व सदस्य चर्चा करीत होते. अनेकांना बरीच रक्कम मिळत असल्याचे त्याने पाहिले. सागरने अधिक परतावा मिळत असल्याने पेड टास्कमध्ये रक्कम गुंतविली. सुरुवातील १७ हजार गुंतविल्यानंतर सागरच्या खात्यामध्ये २३ हजार रुपये जमा झाले. ते पाहून सागरने गुंतवणुकीची रक्कम वाढविण्यास सुरुवात केली. टप्याटप्याने त्याने तब्बल ३९ लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर ऑनलाइन पाठविले. सागरला पैशाची गरज भासली तेव्हा पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता कर भरायला लागेल सांगून आणखी पैशाची मागणी केली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे सागरच्या लक्षात आले आणि त्याने सायबर पोलिसांत तक्रार केली.

आठवड्याभरातील फसवणुकीच्या घटना

भायखळा : हेल्थकेअर कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणाला आठ लाखांचा गंडा.

ओशिवरा : ठाण्यात नोकरी करणाऱ्या जोगेश्वरीच्या महिलेला सात लाखांना फसविले.

चेंबूर : टास्कच्या नावाखाली एक लाख २७ हजारांची फसवणूक करण्यात आली.

जुहू : संस्थेतील मॅनेजरला घरबसल्या कमविण्याचा मोह अडीच लाखांना पडला.

दहिसर : गृहपयोगी वस्तूच्या व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने दोन लाख गमावले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button