केवायसीच्या निमित्ताने २८ व्यवहारांद्वारे फसवणूक; पण तक्रारदाराला एकही संदेश मिळाला नाही
विक्रोळी परिसरातील ६४ वर्षीय व्यक्तीची केवायसीच्या नावाखाली सायबर भामट्यांनी साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई : विक्रोळी परिसरातील ६४ वर्षीय व्यक्तीची केवायसीच्या नावाखाली सायबर भामट्यांनी साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपींनी २८ व्यवहारांद्वारे तक्रारदाराची फसवणूक केली असून त्याबाबत तक्रारदाराला एकही संदेश आला नाही. त्यामुळे याप्रकरणी आता पोलिसही तपास करीत आहेत.
तक्रारदार वृद्ध व्यक्तीचे खासगी बँकेच्या ठाणे शाखेत खाते आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी त्यांना एका मोबाइल क्रमांकावरून दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण बँकेतून बोलत असल्याचे तक्रारदाराला सांगितले. त्यानंतर दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपले केवायसी अपडेट झाले नसल्याचे सांगून तक्रारदारांकडे पॅन कार्डचा तपशील मागितला. नंतर, दूरध्वनी करणाऱ्याने बँकेच्या ॲप्लिकेशनमध्ये विविध माहिती अपडेट करण्याची सूचना केली. या सूचनांचे तक्रारादाने पालन केले. बँकेचा सर्व्हर धीम्या गतीने काम करीत असल्यामुळे तपशील अद्ययावत होण्यास वेळ लागेल, असे सांगून त्या व्यक्तीने दूरध्वनी ठेवला. त्याच दिवशी संध्याकाळी तक्रारदार बाजारात गेले होते. त्यांनी यूपीआयद्वारे एक वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी खात्यात रक्कम शिल्लक नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यामुळे त्यांनी बँकेचे व्यवहार तपासले असता त्यांच्या खात्यातून २८ व्यवहार करून एकूण सहा लाख ४५ हजार रुपये काढण्यात आल्याचे लक्षात आले. बहुतांश व्यवहार २४ ते २५ हजार रुपयांच्या दरम्यान होते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार केली. आरोपीने बँकेच्या नावाने ट्रू कॉलरवर खोटे नाव ठेवले होते. तसेच बँकेच्या लोगोचा व्हॉट्स ॲप डीपी ठेवला होता. दरम्यान, या व्यवहारानंतरही तक्रारदाराला संदेश कसे आले नाही, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. त्यासाठी बँकेकडून व्यवहारांची माहिती घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.