वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यास अटक
पुणे : धन्वंतरी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या हस्तांतराबाबत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संजोग महादेव देशमुख (रा. कोल्हापूर) यास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. न्यायालयाने आरोपीला १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात फिर्यादी परिक्षीत नामपूरकर यांनी पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे आणि पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे पोलिस निरीक्षक विशाल मोहिते यांच्या पथकाने आरोपी संजोग देशमुखला अटक केली.
तर, महादेव देशमुख मार्च २०२२ पासून फसवणुकीच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत आहे. आरोपी देशमुखला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी कामकाज पाहिले. तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. रेणुका देशपांडे कर्जतकर यांनी कामकाज पाहिले.