तिकीट वाटपावरून भाजपात महासंग्राम, केंद्रीय मंत्र्यांना धक्काबुक्की; कपडे फाडले, गनमॅनलाही चोपले
मध्य प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शनिवारी पाचवी यादी जाहीर केली. भाजपने 92 उमेदवारांची घोषणा केली. मात्र ही यादी जाहीर होताच पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी तुफान राडा घातला.
एवढेच नाही तर नाराज कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेशचे निवडणूक प्रभारी भुपेंद्रसिंह यादव यांनाही धक्काबुक्की केली. त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात गनमॅनलाही चांगलाच चोप दिला. या सर्व गदारोळात कार्यकर्त्यांनी एकमेकांचे कपडेही फाडले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मध्य प्रदेशमध्ये 230 विधानसभा जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपली पाचवी यादी शनिवारी जाहीर केली. या यादीत जबलपूर उत्तर-मध्य विधानसभा मतदारसंघातून अभिलाष पांडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने भाजप कार्यकर्ते भडकले.
माजी मंत्री शरद जैन, धीरज पटेरिया आणि नगरसेवक कमलेश अग्रवाल यांचे समर्थक भाजप कार्यालयात घुसले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर येथे अभुतपूर्व गोंधळ उडाला. मधस्थीसाठी आलेल्या केंद्रीय मंत्र्यांनाही कार्यकर्त्यांनी जुमानले नाही.