सरकारला उडता पंजाबच्या धर्तीवर उडता महाराष्ट्र बनवायचाय – जितेंद्र आव्हाड
ड्रग्स माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी चेन्नईमधून अटक केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना ललित पाटील याने खळबळजनक विधान केलं होतं.
मी पळून गेलो नव्हतो, मला पळवलं होतं असं त्याने म्हटलं आहे. त्यानंतर विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं आहे. अशात आता पैठणमधून मोठी बातमी समोर आली आहे.
पैठण सारख्या छोट्या शहरामध्ये 250 कोटींचं ड्रग्स सापडलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे
ट्विट करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “पैठण सारख्या छोट्या शहरात 250 कोटींचे ड्रग्स सापडले आहेत. हे भयावह आहे.पैठण ही आध्यात्मिक नगरी आहे.
याठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात जर ड्रग्स सापडणार असतील तर संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रमाण किती असेल..? याचा विचार करूनच अंगावर काटा येतो.
मागील अधिवेशनात मी ड्रग्स संदर्भात भूमिका मांडत यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.परंतु या ट्रिपल इंजिन सरकारला बहुतेक उडता पंजाबच्या धर्तीवर उडता महाराष्ट्र बनवायचा आहे,अस वाटत आहे.या राज्यातील तरुणाई मोठ्या संकटात आहे.”
दरम्यान, ललित पाटील आणि भूषण पाटील या दोघांनी मिळून ड्रग्स बनवण्याचा कारखाना सुरू केला होता. त्यांच्या या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापेमारी केली होती.
त्यापूर्वी ललित पाटील गेल्या नऊ महिन्यांपासून ससून रुग्णालयात उपचार घेत होता. यादरम्यान तो पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून गेला होता.
सत्ताधारी पक्षानं त्याला पळून जाण्यास मदत केली असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. यानंतर विरोधक या मुद्द्यावरून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहे.