पुणे

देवेंद्र फडणवीस बागेश्वर बाबांपुढे नतमस्तक:म्हणाले, सनातन म्हणजे अनादी अन् अनंत, त्यासाठी धीरेंद्र शास्त्रींचे कार्य उत्तम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात जाऊन बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांचं दर्शन घेतलं. फडणवीस बागेश्वर बाबांपुढे नतमस्तक झाले. त्यावेळी बागेश्वर बाबांनीही फडणवीसांचे कौतुक केले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत म्हणून मी त्यांचं कौतुक केलेलं नाही. ते रामभक्त आहेत म्हणून मी त्यांच्याविषयी बोलतोय, असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले. जे रामाचे भक्त असतात ते सगळ्यांचे असतात. जे रामाचे भक्त नसतात ते कुणाचेच नसतात असेही ते म्हणाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बागेश्वर बाबा सनातन धर्मासाठी उत्तम काम करत असल्याचे म्हणत त्यांचे तोंडभरुन कौतुक केले.

बागेश्वर बाबांविषयी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

बागेश्वर बाबा सनातन धर्माची सेवा करत आहेत. सनातन धर्मासाठी जनजागृती करत आहेत. जर भारताची जागृती झाली तर जगाची जागृती होईल. रामलल्ला जिथे विराजमान होते तिथेच प्रभू रामाचं मंदिर होतं आहे आणि २२ जानेवारीच्या दिवशी तिथेच रामलल्लाची प्रतिष्ठापना होते आहे. बागेश्वर बाबा जेव्हा सनातन धर्माची गोष्ट करतात तेव्हा अनेक लोक त्यांना नावं ठेवतात. त्यांचा अपप्रचार करतात. सनातन म्हणजे जातीयवाद, परंपरावाद असं काहीजण म्हणतात. पण त्यांना सनातनचा अर्थच कळलेला नाही. सनातनचा अर्थ म्हणजे जे अनादी आणि अनंत आहे ते सनातन आहे. जो सगळ्यांना एकत्र बांधणारा विश्वास आहे, आपण सगले देवाची लेकरं आहोत या विचाराने सनातन धर्म पुढे जातो आहे. पुण्याचं भाग्य आहे की बागेश्ववर बाबा याठिकाणी आले. त्यांनी रामकथाही सांगितली. जो रामकथा ऐकतो त्याचं आयुष्य सार्थकी लागतं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्रात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अनेक संघटना आक्रमक झाल्या. तसेच त्यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या दाव्याला आव्हानही दिलं. या पार्श्वभूमीवर धीरेंद्र शास्त्रींनी बुधवारी (२२ नोव्हेंबर) देहूत जाऊन संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी पत्रकारांनी धीरेंद्र शास्त्रींना संत तुकाराम महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या चुकीची जाणीव झाली का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी त्यांची भूमिका मांडली.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, “मी तेव्हा एक लेख वाचला होता. त्या लेखाच्या आधारे मी त्या भाषेत बोललो होतो. त्याआधीही मी महाराष्ट्रात आलो होतो. त्यामुळे मला संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी माहिती आहे. मी त्यांच्याविषयी जेवढं शक्य होतं तेवढं वाचलं आहे. मी असं कधीही कोणत्याही संताविषयी म्हटलेलं नाही.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button