‘एमआयएम’च्या उमेदवाराचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर,”हिंदुस्तान जितका हिंदूंचा आहे तितकाच मुस्लिमांचाही,”
पंतप्रधान मोदींनी कर्नाटाकातील मुस्लिम आणि ओबीसी आरक्षणावर वक्तव्य केल्यानंतर पुण्यातील एमआयएमचे नेते आक्रमक झाले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पुण्याचे एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी प्रत्युत्तर दिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके म्हणाले, पंतप्रधान मोदीजी आले होते आणि त्यांनी कर्नाटकातील ओबीसी आणि मुस्लिम आरक्षणावर वक्तव्य केले. मुस्लिमांनी ओबीसींच्या आरक्षणावर डाका टाकला आहे. आणि कर्नाटकात काँग्रेसच्या राज्यात असे घडल्याचे पंतप्रधान मोदी म्हणत आहेत.सुंडके पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी काहीही म्हणत असले तरी मी सांगतो, हिंदुस्तान जितका हिंदूंचा आहे तितकाच मुस्लिमांचाही आहे. हे पंतप्रधानांना समजायला पाहिजे. सत्तेत जेवढा हिंदूंचा हात आहे, तितकाच मुस्लिमांचाही आहे. त्यामुळे मी मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो की, पंतप्रधानांना आता काहीही काम राहिले नाही. विकासाच्या कोणत्याही गोष्टी करत नाहीत. ते फक्त हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात निवडणुकीचे 2 टप्पे पार पडले आहे. तिसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचार सभांचा धडाका लावला आहे.गेल्या दोन दिवसांत पंतप्रधान मोदींनी कराड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, माळशिरस आणि धाराशिव येथे सभा घेतल्या आहेत.दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. पुण्यात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून माजी नगरसेवक वसंत मोरे आणि एमआयएमकडून अनिस सुंडके यांच्यात लढत होणार आहे.यातील सर्वच उमेदवार तुल्यबळ असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.