पुणे

लग्नाहून परतणाऱ्या दाम्पत्याचा करुण अंत, सात वर्षांचं लेकरु पोरकं,माळशेज घाटात भीषण अपघात

 (पुणे) : मुरबाड येथील नगर-कल्याण रस्त्यावर दुधाचा टँकर आणि टेम्पो यांच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर दोघे जण यात गंभीर जखमी झाले आहेत.
अक्षय शांताराम दिघे (वय ३३) आणि तेजल अक्षय दिघे (वय २६) तसेच टँकर चालक दत्तात्रय किसन वामन हे जागेवरच ठार झाले तर शकील अमजत शेख या टेम्पो चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. जखमींवर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाबत निसार लतीफ पठाण यांनी टोकवडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिघे पती पत्नी हे नातेवाईकाच्या लग्ना निमित्त गावी आले होते. मात्र शुक्रवारी दुपारी परत मुंबईला दुधाच्या टँकरमध्ये माळशेज मार्गे कल्याणला जात होते. त्यावेळी कल्याण बाजूकडून जुन्नर बाजूला येत असलेल्या मालवाहू ४०७ टेम्पोची नगर-कल्याण महामार्गावर आवळ्याची वाडी येथे समोरासमोर धडक झाली,समोरासमोर झालेली धडक एवढी भीषण होती की, दुधाच्या टँकरची टाकी तुटून बाजूला पडली. तसेच समोरच्या टेम्पोची देखील मोठे नुकसान झाले. यात बसलेले दिघे दाम्पत्य जागीच ठार झाले. तसेच दुधाच्या टँकर चालकाचा देखील जागेवर मृत्यू झाला.  टेम्पो चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 या प्रकरणाचा अधिक तपास टेकावडे पोलिस करत आहे.

या अपघातात सुदैवाने दिघे यांचा सात वर्षांचा मुलगा आरूष वाचला असून तो जखमी झाला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button