अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी…
आपल्या लाडक्या दैवताचं दर्शन घेण्यासाठी हे भाविक आले आहेत. पूजा, आरती करत देवाला साकडे घातली जात आहेत.यावेळी सामूहिक आरतीही करण्यात येत आहे. पहाटेपासूनच भाविक विविध मंदिरात दाखल झाले. प्रत्येकजण रांगेत उभा राहून देवाचं दर्शन घेत होता. कोणतीही गडबड आणि गोंधळ न करता हे भाविक गर्दीतून मार्गक्रमण करत होते.मुंबईतील प्रभादेवी येथे असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. अशी माहिती मंदिर ट्रस्टी आरती साळवी यांनी दिली.वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या दक्षिणमुखी गणेश मंदिरात आज अंगारकी चतुर्थी निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. परळी पंचक्रोशीत दक्षिणमुखी गणेश मंदिर हे जाज्वल्य देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. संकष्टी चतुर्थी ज्या दिवशी मंगळवारी येते, त्या संकष्टीला अंगारकी संकष्टी म्हटले जाते. ही अंगारकी संकष्टी विशेष अशी आहे. सर्व संकष्टींमध्ये तिचे महत्त्व अधिक मानले जाते. ही अंगारकी संकष्टी कल्याणप्रद आणि शुभदायक अशी मानली जाते.सांगलीमध्ये आज अंगारकी संकष्टीनिमित्त गणेश भक्तांनी मुख्य गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. यंदाच्या वर्षातील ही पहिली आणि शेवटची अंगारकी संकष्टी असल्याने भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. यानिमित्त सांगलीतील गणपती मंदिराच्या परिसरामध्ये आकर्षक सजावट सुद्धा संस्थांनकडून करण्यात आली.अष्टविनायक गणपतींपैकी महत्त्वाचे आणि सर्वात श्रीमंत गणपती अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील ओझरचे विघ्नहर गणपती मंदिर पहाटे५ वाजल्यापासून खुले करण्यात आले. पहाटे ५ वाजल्यापासून या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. ही गर्दी अजूनही ओसरताना दिसत नाहीये.रत्नागिरीच्या गणपतीपुळ्यातही आज भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. तब्बल ५ ते दीड लाख भाविक गणपतीपुळ्यात आल्याने संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. केवळ कोकणातूनच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी आले आहेत. २०२४ मधील ही पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे.अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. चतुर्थीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिराला विविध रंगी फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. मंदिरात पहाटेपासूनच विविध कार्यक्रमांचं विशेष आयोजन करण्यात आलं आहे. जळगावच्या पद्मालय तीर्थक्षेत्रावर अंगारकी चतुर्थी निमित्ताने राज्यभरातील भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. या वर्षातील ही पहिलीच आणि शेवटची अंगारकी चतुर्थी असल्यामुळे दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर उजव्या आणि डाव्या सोंडेचे गणपती विराजमान आहेत. देशातल्या गणपतीच्या अडीच पीठांपैकी एक म्हणून पद्मालय येथील गणपतीची ओळख आहे. प्राचीन आणि जागृत देवस्थान असल्यामुळे दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांची पहाटेपासूनच मंदिरात गर्दी झाली आहे