ठाणे

सरकारी जमिनीवर ८ हजार ५७३ बेकायदा बांधकामांवर कारवाई

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील सन २००७ पर्यंतचा ६७ हजार ९४७ बेकायदा बांधकामांचा विषय मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यानंतरच्या सतरा वर्षाच्या कालावधीत ९७ हजाराहून नवीन बेकायदा बांधकामे पालिका हद्दीत उभी राहिली आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्द आणि कल्याण तालुक्याच्या ग्रामीण हद्दीतील ११८ हेक्टर १८ एकर सरकारी जमिनीवर आठ हजार ५७३ बेकायदा बांधकामे उभी आहेत. वाणिज्य, रहिवास आणि शेती अशा तीन प्रकारांमध्ये ही बेकायदा बांधकामे स्थानिक प्रशासनांच्या बांधकाम परवानग्या न घेता, महापालिका आणि शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडवून हे बेकायदा इमले ठोकण्यात आले आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील सन २००७ पर्यंतचा ६७ हजार ९४७ बेकायदा बांधकामांचा विषय मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यानंतरच्या सतरा वर्षाच्या कालावधीत ९७ हजाराहून नवीन बेकायदा बांधकामे पालिका हद्दीत उभी राहिली आहेत. कडोंमपा हद्दीत एक लाख ६५ हजार बेकायदा बांधकामे उभी आहेत, अशी माहिती स्थानिक रहिवासी आणि याचिकाकर्ते हरिश्चंद्र म्हात्रे यांनी जनहित याचिकेव्दारे मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.

म्हात्रे यांच्या याचिकेवरून मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने कल्याण डोंबिवली पालिका आणि ग्रामीण हद्दीत किती बेकायदा बांधकामे उभी आहेत, अशी माहिती देण्याचे आदेश जानेवारीमध्ये महसूल विभागाला दिले होते. कल्याणचे उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी तहसीलदार सचिन शेजाळ यांचा कडोंमपा आणि ग्रामीण हद्दीतील बेकायदा बांधकामांचा अहवाल न्यायालयाला सादर केला आहे. मंडळ अधिकारी, तलाठी, पालिका आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून बहुतांशी बांधकामे जमीनदोस्त केली आहेत, असे प्रतिज्ञापत्र उपविभागीय अधिकारी गुजर यांनी न्यायालयाला दिले आहे. अधिक माहितीसाठी पालिका अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांना बेकायदा बांधकामांवरील कारवाईच्या नियोजनाविषयी संपर्क साधला. ते व्यस्त होते.

कल्याण डोंबिवली पालिका शहरी भागात सरकारी जमिनीवर सात हजार ७९३ इमारती, चाळींची, ४५९ वाणिज्य स्वरुपाची बेकायदा बांधकामे आहेत. ठाकुर्लीतील ४३ हेक्टर ३७ एकर क्षेत्रावर १६३९ बेकायदा इमले, ४२३ वाणिज्य बांधकामे, टिटवाळ्यातील १५ हेक्टर १५ एकर क्षेत्रावर २५७३ बेकायदा इमले, कल्याणमधील ३१ हेक्टर क्षेत्रावर ३५८१ बेकायदा बांधकामे आहेत. कल्याण ग्रामीणमधील नडगाव, म्हारळ मंडळ विभागात २८ हेक्टर २५ एकर क्षेत्रावर ८०० बेकायदा बांधकामे आहेत. म्हारळमधील सर्व्हे क्रमांक १९ वरील १७ हेक्टर ९ एकर क्षेत्रावर ५६४ घरे, तीन वाणिज्य बांधकामे आणि चार ठिकाणी शेती केली जाते. नडगाव मधील सर्व्हे क्रमांक ११ हेक्टर १५ एकरवर २१६ बेकायदा घरे, १३ ठिकाणी शेती केली जाते.

डोंबिवली एमआयडीसीतील ८९ एकर (३६ हेक्टर) क्षेत्रावर बेकायदा इमले उभे आहेत. बेकायदा इमारतींना महारेराची नोंदणी प्रमाणपत्र जोडणाऱ्या डोंबिवलीतील ६५ माफियांवर पालिकेने गुन्हे दाखल केले आहेत. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पालिका हद्दीत एकही नवीन बेकायदा उभे राहणार नाही, असे हमीपत्र न्यायालयाला देऊनही बेसुमार बेकायदा बांधकामे सुरू आहेत. ६५ महारेरा प्रकरणातील बहुतांशी इमारतींवर कारवाई करण्यात आलेली नाही. कल्याण तालुका हद्दीतील सरकारी जमिनींवरील बहुतांशी बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. काही बांधकामांमध्ये रहिवास आहे. वाणिज्य बांधकामे तोडली आहेत. पावसाळ्यानंतर तोडकामाची मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. – विश्वास गुजर, उपविभागीय अधिकारी, कल्याण.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button