मुंबई

जुहू समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता; जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या बैठकीत उपक्रम

दक्ष पोलिस न्यूज प्रतिनिधी (मुंबई) : जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी-२० समुद्रकिनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची तसेच प्रदूषण व कचऱ्यापासून समुद्राचे रक्षण करण्याची शपथ देऊन परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत स्वत: स्वच्छता केली. स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन शिंदे यांनी यावेळी केले.
जुहू चौपाटी येथे आयोजित या मोहिमेत केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री भूपेंद्र यादव, राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, प्रधान सचिव प्रवीण दराडे, महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आदी उपस्थित होते.जी-२० परिषदेतील विविध देशांच्या प्रतिनिधींचे स्वागत करून शिंदे म्हणाले, मुंबई हे गतिशील शहर असून देशाच्या विकासाचे इंजिन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर या अभियानाने जनआंदोलनाचे रूप घेतले आहे. देशातील प्रत्येक गाव, शहर स्वच्छतेच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. राज्य शासनानेही पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केले असून त्यासाठी पावले उचलली आहेत. यात मोठय़ा प्रमाणात लोकसहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
राज्य शासनाला केंद्र सरकारचे सहकार्य नेहमी मिळत आहे. त्यातून राज्याला विकासाकडे नेण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे, असे शिंदे यांनी सांगितले. त्यांनी चौपाटीवर नागरिकांशी संवाद साधून स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व आदी मुद्दय़ांवर संवाद साधला.जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री भूपेंद्र यादव यांनी जुहू येथे या मोहिमेत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button