सहा महिन्यांत ३१ गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोका’ ; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची माहिती
पुणे : शहरात मागील सहा महिन्यांत संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत ३१ गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मोका कायद्यांतर्गत २७७ सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
तसेच, एमपीडीए कायद्यांतर्गत २४ गुन्हेगारांची थेट कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.
सदाशिव पेठेत एकाने महाविद्यालयीन तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, ‘‘ही घटना दुर्दैवी होती. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.
शाळा-महाविद्यालयांतील तसेच शालाबाह्य अल्पवयीन मुला-मुलींचे समुपदेशन करण्यात येत आहे. मागील सहा महिन्यांत पोलिस रेकॉर्डवरील १४ हजार ४०० लोकांवर विविध कलमांखाली कारवाई केली आहे.
शहरातील १११ पोलिस चौक्यांना सीसीटीव्हीने जोडण्यात येणार आहे. दोन शिफ्टमध्ये पोलिस चौक्या सुरू राहतील. वरिष्ठ पोलिस अधिकारी त्या पोलिस चौक्यांना अचानक भेटी देतील.’’जागतिक अमली पदार्थ दिवसाच्या पार्श्वभूमीवर व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार आहे. पुढील दोन महिन्यांत दहा लाख लोकांपर्यंत पोचणार आहोत. त्यापैकी सुमारे पाच लाख विद्यार्थी असून, त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिसांकडून विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. महिलांना कोणी त्रास देत असल्यास त्यांनी पोलिसांत तक्रार देण्यासाठी पुढे यावे. तक्रार केल्यानंतर अनुचित घटना टाळणे शक्य होते.
परंतु काहीजण भीती आणि बदनामीपोटी तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे शाळा- महाविद्यालयांत तक्रार पेट्या बसविण्यात येत आहेत. या तक्रारींची पोलिसांकडून तातडीने दखल घेण्यात येणार आहे. तसेच, संबंधित तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी स्पष्ट केले.