पुण्यात व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून लुटणारे गजाआड
पिंपरी परिसरातील एका व्यावसायिकाल मोहजालात अडकवून त्याला लुटणाऱ्या तिघांना वारजे पोलिसांनी अटक केली.
पुणे : पिंपरी परिसरातील एका व्यावसायिकाल मोहजालात अडकवून त्याला लुटणाऱ्या तिघांना वारजे पोलिसांनी अटक केली. अक्षय राजेंद्र जाधव (वय २८, रा. कर्वेनगर), शिवाजी गोविंदराव सांगोले (वय ३४, रा. नऱ्हे), भरत बबन मारणे (वय ४५, रा. रामनगर, वारजे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत एका व्यावसायिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार व्यावसायिक पिंपरी-चिंचवड शहरातील आहे. समाजमाध्यमातून त्याची एका महिलेशी ओळख झाली होती. महिलेने त्याच्याशी संपर्क साधून त्याला वारजे भागातील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले होते. आरोपी जाधव, सांगोले, मारणे तेथे दबा धरून बसले होते.
व्यावसायिक हॉटेलजवळ आला. तेव्हा तिघांनी त्याला धमकावण्यास सुरुवात केली. तू महिलांचे चित्रीकरण करतो. आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी करुन चोरट्यांनी त्याला वारजे भागातील एका बँकेच्या एटीएम केंद्रात नेले. त्याला धमकावण्यात आले. त्याच्या बँक खात्यातून ५३ हजार रुपये काढून घेण्यात आले. व्यावसायिकाकडील रोकड चोरुन आरोपी पसार झाले. घाबरलेल्या व्यावसायिकाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला.
तांत्रिक तपासात आरोपी अक्षय जाधव पुन्हा वारजे भागातील हॉटेलजवळ थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याबरोबर असलेले साथीदार सांगोले आणि मारणे यांना पकडले. पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील जैतापूरकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अजय कुलकर्णी, उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, अमेल राऊत, अमोल सुतकर, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, अजय कामठे, राहुल हंडाळ आदींनी ही कारवाई केली. सहायक निरीक्षक ए. बी. ओलेकर तपास करत आहेत.