पुणे

फुकट्या प्रवाशांवर रेल्वेकडून कारवाई तीव्र! दररोज लाखोंची वसूली…

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने फुकट्या प्रवाशांवरील कारवाई तीव्र केली आहे. जानेवारी महिन्यात विनातिकीट, अनियमित आणि सामानाची नोंदणी न करता प्रवास करणाऱ्या २७ हजार ८०१ जणांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला.

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने फुकट्या प्रवाशांवरील कारवाई तीव्र केली आहे. जानेवारी महिन्यात विनातिकीट, अनियमित आणि सामानाची नोंदणी न करता प्रवास करणाऱ्या २७ हजार ८०१ जणांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला. गेल्या महिन्यात या कारवाईतून रेल्वेने दररोज सरासरी ६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पुणे विभागाने जानेवारी महिन्यात विनातिकीट प्रवासी, अनियमित प्रवास आणि सामान नोंदणी न करता घेऊन जाणाऱ्या २७ हजार ८०१ प्रवाशांकडून १ कोटी ७२ लाख रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या महिन्यात या मोहिमेत तिकीट तपासणीदरम्यान १९ हजार ८५९ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून १ कोटी २६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अनियमित प्रवास करणारे ७ हजार ७६६ प्रवासी सापडले. त्यांना ४५.७५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, सामानाची नोंदणी न करता घेऊन जाणाऱ्या १७६ प्रवाशांकडून २१ हजार ६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सुरू आहे. प्रवाशांना योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे आवाहनही रेल्वेने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button