पुणे

रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप,पुण्यातील अनेक पब भाजप नेत्यांच्या मालकीचे, त्यात पोलिसांचीही भागिदारी…….

पुणे : विशाल अग्रवाल या बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने रविवारी मध्यरात्री आपल्या भरधाव पोर्शे गाडीने दुचाकीवर चाललेल्या अनिश अवधीया आणि अश्विनी कोष्टा या तरुणांना चिरडल्यामुळे त्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अल्पवयीन आरोपीला अवघ्या पंधरा तासात मिळालेल्या जामीनानंतर एकूणच पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या अपघातानंतर पुण्यातील पब संस्कृती आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईवर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी ताशेरे ओढले आहेत.पुण्यात झालेला अपघात हा अपघात नसून ती एक हत्या आहे. हा अपघात करणाऱ्या आरोपीला आणि त्याचा परिवाराला पुणे पोलिसांनी रेड कार्पेट टाकून त्याला दोन तासात घरी पाठवण्याचा प्रताप केला आहे. जी मुलं मृत्यूमुखी पडली होती त्यांचं शव ससूनच्या शवगृहामध्ये होतं, त्यांच्याकडे पाहण्यासाठी पोलिसांना वेळ नव्हता. घटनेचा पंचनामा कधी झाला? त्यांच्या पालकांची काय अवस्था होती? याकडे पोलिसांनी पाहिलं देखील नाही. पाकीट संस्कृतीच्या जोरावर अपघात करणारा मुलगा जामिन घेऊन घरीही गेला, असं धंगेकर म्हणाले.पुण्यात जे पब चालतात हे भाजप नेत्यांच्या मालकीचे आहेत, तसेच त्यात पोलिसांची देखील भागिदारी आहे. पहाटे चार पर्यंत चालणारे पब महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाडले. पण यामध्ये पोलिसांनी कुठे कारवाई केली? कुठे फौजदारी गुन्हे दाखल केले? म्हणजे याचा अर्थ सरळ आहे पोलिसांच्या आशीर्वादाने हे पब सुरू होते. अनधिकृत पबवर पोलिसांनी कोणती कारवाई केली, याचे उत्तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना द्यावं. पुणे शहराला लागलेली कीड, सुरू असलेली पाकीट संस्कृती, जे पोलीस अधिकारी आणि कॉन्स्टेबल हप्ते घेऊन मालक असल्यासारखे वावरतात त्यांच्याबद्दल आज मी आवाज उठवला आहे. जर पोलीस आणि यंत्रणाच खराब झाली असेल तर पुणेकरांनी या शहरांमध्ये कसं राहायचं? असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी विचारला.पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. लाखो विद्यार्थी पुण्यामध्ये शिकायला येतात. पुण्यामधून विद्यार्थी नक्की काय घेऊन जाणार आहेत? शिक्षण घेऊन जाणार आहेत की पब संस्कृती घेऊन जाणार आहेत? की अमली पदार्थ सेवन करणारा व्यसनी विद्यार्थी घेऊन जाणार आहे? अशी चिंता आता पालकांना पडली आहे. या सगळ्यांची जबाबदारी पोलिसांची आणि गृहमंत्र्यांची आहे, असेही रवींद्र धंगेकर म्हणाले.पुण्यात सुरू असणारी ही पब संस्कृती कायमची मिटवली पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक हे पब मालक आहेत, ही वस्तुस्थिती आहे, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. महानगरपालिकेने कारवाई केली तिथे पोलिसांनी देखील कारवाई करावी अन्यथा पोलीस खाते आणि गृहमंत्रालय पब मालकांना संरक्षण देते आहे, हे सिद्ध होईल, असे धंगेकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button