मुंबई

राज ठाकरेंची आषाढी एकदशीनिमित्त पोस्ट करत; सामाजिक स्थितीवर टीका

 मुंबई :  ऊन-वारा-पाऊस या कशाचीच तमा न बाळगता ओठी विठूरायाचे नामस्मरण करत अनेक वारकरी पायी पंढरपुरापर्यंत पोहोचतात. पंढरपुरात पोहोचेपर्यंत अनेकविध मानवी स्वभावाचं दर्शन वारकऱ्यांना होत असतं. यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे.“आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक; शुभेच्छा. गेली ८ शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढपुराला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल. म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही, असं नाही.

‘यात्रा’ ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग. पण चारधाम यात्रा असो की काशीची यात्रा असू दे, त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या. त्या देखील एकदाच घडतात. पण वारीचं असं नाही. विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करावयाचा, उन्हात, पावसापाण्यात, पडतील त्या हालअपेष्टा सोसत.

वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात. निघताना आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे ही श्रद्धा मनात घेऊन निघायचं. समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता, जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं”, असं राज ठाकरे  म्हणाले.

देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव. पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मी पण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार. त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो. पण दुर्दैवाने गेलं एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे विष इतकं खोलवर रुजत चालले आहे की हाच तो का महाराष्ट्र असा प्रश्न पडतो.

जेंव्हा अगदी ७, ८ वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेंव्हा मात्र भीती वाटते”, अशी चिंताही राज ठाकरे  यांनी यानिमित्ताने उपस्थित केली.“मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला, सत्व न गमावलेला मराठी समाज, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर ‘महा’राष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज, अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मूठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला आहे हेच कळत नाही. म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे”, असं साकडं राज ठाकरेंनी  आज विठूराकडे घातलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button