राष्ट्रीय

दिल्लीला छावणीचे स्वरूप : कुस्तीपटूंवर चालविल्या लाठ्या, आंदोलन स्थळावरून तंबू उखडून फेकले

दक्ष पोलिस न्यूज प्रतिनिधी (नवी दिल्ली) : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी संपूर्ण दिल्लीला छावणीचे स्वरूप आले होते. संसद भवनापासून ४०० मीटर अंतरावर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर लाठ्या चालविण्यात आल्या. त्यांचे तंबू उखडून फेकून देण्यात आले. काँग्रेससह २० विरोधी पक्षांच्या बहिष्कारामुळे भीतीच्या वातावरणात संसद भवनाचे उद्घाटन झाले. १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजीच्या पोलिस बंदोबस्तापेक्षाही जास्त कडक बंदोबस्त या कार्यक्रमासाठी होता. नवी दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर काल रात्रीपासूनच बॅरिकेड्स करण्यात आले होते. सर्वसामान्य लोकांना नवी दिल्लीकडे जाण्यापासून रोखण्यात आले. कुस्तीपटूंनी बॅरिकेड्स ओलांडून नव्या संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना रोखण्यात आले. त्यावेळी त्यांची पोलिसांसोबत झटापट झाल्यानंतर विनेश फाेगट, संगीता फाेगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह समर्थकांवर पोलिसांनी लाठ्या चालविल्या. त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सायंकाळी उशिरा विनेश, संगीता आणि साक्षी यांना सोडून दिले, तर बजरंग पुनिया उशिरापर्यंत ताब्यात होते.

माध्यमकर्मींनी सर्व पास दाखविले तरी त्यांना रोखले जात होते. पावलोपावली पोलिस, सीआरपीएफ, रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आले होते. पोलिस नियंत्रण कक्ष, पीसीआर क्षणाक्षणाची माहिती घेत होते. विरोधकांकडून आजच्या आयोजनात बाधा आणण्याचा प्रयत्न केला जाण्याच्या शक्यतेने ही खबरदारी घेण्यात आली होती. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या पदक विजेत्या कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी बळाच्या जोरावर रस्त्यावरून उचलले व त्यांचे तंबू उखडून फेकले. कुस्तीपटूंना मारहाण करण्याचा विरोध करण्यासाठी आलेल्या त्यांच्या समर्थकांवरही पोलिसांनी काठ्या चालविल्या व त्यांना जंतरमंतरहून हटवले.

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी कुस्तीपटूंनी नवीन संसदेसमोर निदर्शने करण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी संपूर्ण दिल्लीला छावणीचे स्वरूप दिले होते. कुस्तीपटूंना मारहाण करून तेथून हटवण्यात आले.  रविवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत दिल्लीकरांना या प्रकाराचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. कुस्तीपटूंच्या समर्थकांनाही नवी दिल्लीच्या भागात जाण्यापासून रोखण्यात आले. हरयाणा व पश्चिम उत्तर प्रदेशमधून दिल्लीत येणाऱ्या वाहनांची वाहतूक आधीच वळविण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button