पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसावर हात उचलणे सुनील कांबळे यांच्या आले अंगलट
ससून रूग्णालयातील कार्यक्रमावेळी पोलिस कर्मचाऱ्यावर हात उचलणे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.
पुणे – ससून रूग्णालयातील कार्यक्रमावेळी पोलिस कर्मचाऱ्यावर हात उचलणे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. कांबळे यांच्याविरुद्ध अखेर शुक्रवारी मध्यरात्री बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कांबळे यांनी मारहाण केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याने त्याबाबत अद्याप तक्रार दाखल केलेली नाही.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी शिवाजी सरक (वय ३०) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आमदार कांबळे यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे बंडगार्डन पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी म्हणून नेमणुकीस आहेत. (ता.५) रोजी फिर्यादी हे ससून ससून रुग्णालयातील नव्या इमारतीचे उद्घाटन आणि विविध सेवांचे लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयातील महात्मा गांधी सभागृहातील कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याने फिर्यादीची तेथे बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती.
त्यानुसार, फिर्यादी हे व्यासपीठाजवळील पायऱ्यांजवळ थांबले होते. कार्यक्रम संपल्यानंतर आमदार सुनील कांबळे हे तेथील पायऱ्यांवरून खाली उतरत असताना त्यांचा तोल गेला, त्यावेळी त्यांनी साध्या वेशात असलेल्या फिर्यादीच्या गालावर फटका मारला. ही घटना दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाली.
त्यामुळे कांबळे यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मधाळे करीत आहेत
दरम्यान, कांबळे यांनी पोलिसावर हात उचलल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला, मात्र दुसऱ्या कार्यक्रमातही कांबळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वैद्यकीय मदत सेलचे प्रमुख जितेंद्र सातव यांनाही फटका मारला होता. मात्र सातव यांनी अद्याप कांबळे यांच्याविरुद्ध अद्याप तक्रार दाखल केलेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.